हिंगोली - वसमत शहरातील ब्राह्मण गल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या भागात दहा ते पंधरा दिवसाला नळाला पाणी येत आहे. यासंदर्भात बुधवारी येथील नागरिकांनी सीईओला घेराव घालून नवीन पाईपलाईन करून पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे.
पाण्याच्या मागणीसाठी वसमतकरांचा सीईओंना घेराव
पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी कार्यालयात एकच गोंधळ घातल्याने सीईओही काही काळ चांगलेच गोंधळून गेले होते. त्यानंतर त्यांनी नागरिकांना शांत करत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर काहीतरी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झालेले आहे. प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र हिंगोली जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या येलदरी आणि सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पालिकेच्या नळाला कधी तीन तर कधी चार दिवसाआड पाणी येत आहे.
वसमत येथील ब्राह्मण गल्लीत तब्बल दहा ते पंधरा दिवसाआड नळाला पाणी येत आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी वणवण वाढली. त्यामुळे इतर भागातून नवीन पाईपलाईन करून पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी हा घेराव घालण्यात आला होता. बराच वेळ हा वाद सुरू होता. कोणताही निर्णय येईपर्यंत नागरिकांनी सीईओंना अडवूनच ठेवले होते.