हिंगोली - संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत यापासून बचाव करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तर, प्रत्येकजण सुरक्षेची जनजागृती करत सुटले आहे. हिंगोलीतही अशा प्रकारची मोठ्याप्रमाणात जनजागृती सुरू आहे. शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमांतर्गत दारोदारी विविध पथके फिरून आरोग्याची माहिती घेत कोरोनापासून बचाव कसा करावा, यासंदर्भात माहिती देत आहेत. मात्र, गांधी चौक येथे मास्क वापरण्याचे आवाहन करणाऱ्या एकाच्या तोंडाला मास्क नसल्याने, हे फलक हिंगोली जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहे. मास्कचे आवाहन करणारेच विना मास्क असतील तर याहून दुर्दैवाची बाब कोणती.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. असे असताना, कोरोनापासून बचाव कसा करावा यासाठी जिल्ह्यात सर्वत्र आरोग्य विभागाच्या वतीने विविध सुचनाचे फलक लावले आहेत. त्यामध्ये लोकप्रतिनिधीदेखील अजिबात कमी नाहीत, आता कोणतीही बाब ही फलकाद्वारे सांगितली जात आहे. अन् फलकाद्वारे सांगितलेल्या सूचनांचे बरेचजण पालनदेखील करीत आहेत. याच सूचनांचे पालन व्हावे म्हणून, हिंगोली येथील अति वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या, गांधी चौक येथे व्यापारी महासंघाच्या वतीने नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले एक फलक दर्शनीय भागात लावण्यात आले आहे. या फलकावर तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरा असे आवाहन केले आहे. मात्र, आवाहन करणाऱ्याच्याच तोंडाला मास्क नसल्याने, सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.