हिंगोली - एकही बेघर राहू नये म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून दिले. मात्र, घराच्या बांधकामाकरता लागणाऱ्या निधीचा कसा बसा पहिला अन् दुसरा हप्ता मिळाला. तर, उर्वरित काम पूर्ण करण्याकरता अनेकदा कार्यालयात खेटे घेऊनही तिसरा हप्ता पदरात न पडल्याने शेवटी शेख परवीन या महिलेला आपल्या बहिणीसह उकिरड्यावर राहण्याची भयंकर वेळ येऊन ठेपली आहे.
जिल्ह्यातील एकट्या कळमनुरी तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात १७८ घरकुल मंजूर झाली आहेत. या घरकुलांसाठी ४ कोटी ४५ लाख इतक्या निधीची गरज असताना आत्तापर्यंत ७१ लाख २० हजारांचा पहिला टप्प्यातील निधी मंजूर झाला. अन् ७१ लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता देण्यात आला. सध्या स्थितीत फक्त २० हजार रुपये खात्यात जमा असून दुसऱ्या हप्त्यासाठी १ कोटी ६ लाख ८० हजार रुपयांची गरज असल्याची माहिती नगरपालिकेचे अधीक्षक डी.ए गव्हाणकर यांनी दिली.
कळमनुरी येथील शेख परवीण यांच्या घराचे बांधकाम हे अंतिम टप्यात आले आहे. यासाठी जवळ दमडीही नसल्याने या लाभार्थी महिलेने निधीसाठी अनेकदा नगरपालिकेच्या पायऱ्या झिजविल्या आहेत. मात्र, त्यांना प्रत्येक फेरीमध्ये वरून निधीच आलेला नसल्याचे सांगितले जाते. घर बांधायला काढल्यामुळे घराजवळ असलेल्या उकिरड्याच्या जागेत या महिलेने आपले बस्तान थाटले आहे. साधे उभे राहायला देखील जागा नसलेल्या ठिकाणी ही महिला आपल्या बहिणीसह येथे वास्तव्य करत आहे. तर, जवळूनच वाहत असलेल्या नालीच्या पाण्यामुळे सध्या राहत असलेल्या घरात ओल फुटल्याने मोठी पंचायत निर्माण झाली आहे. अशा भयंकर परिस्थितीत आज न उद्या निधी मिळेल आणि घराचे बांधकाम पूर्ण होईल, याच प्रतीक्षेत परवीन दिवस ढकलत आहे.