हिंगोली - बँकेत आलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सचे नियम तोडले म्हणून शहरातील 20 बँक अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कार्यवाहीला सुरुवात केली आहे, तर बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःहून ठाण्यात धाव घेतली. दुसरीकडे बँकेबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. बँक अधिकाऱ्याकडून नगरपालिका दंड वसूल करण्यात येणार आहे. एवढे करूनही जर बँक व्यवस्थापक जुमानत नसतील तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक ए.आय. शेख यांनी सांगितले.
सोशल डिस्टन्सिंगचा फटका; बँक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दोन हजारांचा दंड - hingoli corona updates
हिंगोलीमध्ये बँकेसमोर नागरिकांनी गर्दी करत नियम मोडल्याने पोलिसांनी चक्क बँक अधिकारी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत, सोशल डिस्टन्सचे नियम न पाळल्याने कारवाई करायला सुरुवात केली आहे.
हिंगोलीमध्ये बँकेसमोर नागरिकांनी गर्दी करत नियम मोडल्याने पोलिसांनी चक्क बँक अधिकारी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत, सोशल डिस्टन्सचे नियम न पाळल्याने कारवाई करायला सुरुवात केली आहे. आज विविध बँकांसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सचे नियम तोडले गेले. यामुळे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिलेले आदेश बँकेत आलेल्या ग्राहकांनी न पाळल्याने, हिंगोली शहर पोलिसांनी याचा ठपका बँक व्यवस्थापनावर ठेवत थेट बँकेच्या मॅनेजरसह बँक अधिकार्यांना ताब्यात घेत हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये आणले आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, युनियन बँक, आदींचा समावेश आहे.
दरम्यान याबाबत पोलिसांनी या सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांचाकडून सोशल डिस्टन्सचे नियम मोडल्याने 2 हजार रुपये दंड वसूल करत समज देत सोडून दिले. तर दुसरीकडे तीन तासांपासून बँकेच्या अधिकाऱ्यांना पोलीस स्थानकात बसवून ठेवल्याने, बँकेत आलेले ग्राहक उन्हात ताटकळत होते. सर्व बँकेचे अधिकारी-कर्मचारी शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पोलीस ठाण्याला काही काळ यात्रेचे स्वरूप पाहावयास मिळाले.