हिंगोली - हिंगोलीमध्ये नव्याने सुरु होत असलेल्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचा ऑनलाइन उद्घाटन सोहळा आज शालेय शिक्षणमंत्री तसेच हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडला. या प्रयोगशाळेचा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना फायदा होणार आहे. या प्रयोगशाळेसाठी खा. राजीव सातव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले आहे.
कोरोना निदानाचा कालावधी दोन ते तीन दिवसांनी कमी झाला -
देशात सध्या कोरोनाची साथ सुरू आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात देखील आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडले आहेत. जिल्ह्यामध्ये एकही प्रयोगशाळा नसल्याने,कोरोनाचे निदान होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागायचा.चाचणी करण्यासाठी रुग्णांचे नमुने नांदेड, औरंगाबादसारख्या ठिकाणी पाठवावे लागत होते. मात्र आता हिंगोलीत प्रयोगशाळा तयार करण्यात आल्याने, रुग्णाचे लवकर निदान होण्यासाठी मदत होणार आहे. या प्रयोेगशाळेत विविध चाचण्या करण्यासाठी आरोग्यविभागाच्या सूचनेनुसार विविध यंत्रसामुग्री उभारण्यात आली आहे. तसेच योग्य त्या मनुष्यबळाची नियुक्ती येणाऱ्या काळात केली जाणार आहे