हिंगोली-मुंबईवरून महिनाभरापूर्वी गावी परतलेल्या एका जणाचा हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अजून तरी कळू शकले नाही. मात्र, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. परंतु, जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने मंगळवारी हिंगोली ग्रीन झोनमध्ये आला होता. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, या युवकाच्या मृत्युमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात भीतीचे वतावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील एकांबा येथील एका युवकाला ताप आल्याने तो 20 एप्रिल रोजी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. डॉक्टराने तपासणी करून औषधोपचार केल्यानंतर तो घरी परतला मात्र ताप कमी झाला नाही म्हणून, तो परत स्वतःहून हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी साठी गेला असता, डॉक्टरांनी त्याची तपासणी केली अन त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळच्या वेळी त्याचा मृत्यू झाला.