हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. कोरोना रुग्णालयांमध्ये रुग्णांचा कशाप्रकारे छळ करण्यात येतोय, यासंदर्भात या महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे.
ऑक्सिजन न मिळाल्याने पती दगावल्याचा आरोप...रुग्णालयाने आरोप फेटाळले पेंटर म्हणून ओळख असलेले संजय अंभोरे यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे ते एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. यानंतर त्यांना 7 सप्टेंबरला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी झाली. दोन दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार अंभोरे यांना कोरोना वॉर्डात हलवण्यात आले.
काही काळानंतर अंभोरे यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज होती. मात्र ऑक्सिजन न पुरवल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप अंभोरे यांच्या पत्नीने केला आहे.
रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
हिंगोलीतील रुग्णालयात संजय अंभोरे या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र आमची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून ऑक्सिजनचा तुटवडा होत नसल्याचे शल्यचिकित्सक किशोर श्रीवास्तव यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा उपलब्ध असल्याचे सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयात मुबलक ऑक्सिजन असून जालन्यातून पुरवठा होत असल्याचे त्यांनी म्हटले. एक दिवसाआड ऑक्सिजनचा टँकर येतो. तर रुग्णालयात तीन ते चार टर्बो सिलेंडर फूल असतात, एका-एका सिलेंडरमधून 26 सिलेंडर भरू शकतात. कोरोनाबाधित रुग्णांचा विचार करूनच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज केलेली आहे, असे ते म्हणाले.
संबंधित व्यक्तीचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होऊच शकत नाही. तरी देखील पुढील चौकशी करणार असल्याचे शल्यचिकित्सक किशोर श्रीवास्तव यांनी सांगितले.