हिंगोली- औंढा नागनाथ तालुक्यातील आडगाव रंजेबुवा फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ढवूळगाव पाटीजवळ बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मालवाहू वाहन ट्रॅक्टरवर आदळले. यात वाहनातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण परळी येथे वीट भट्टीच्या कामासाठी जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मृत व जखमींची नावे कळू शकली नाहीत.
औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी येथील काही कामगार हे वीट भट्टीच्या कामासाठी या वाहनाने परळी येथे जात होते. दरम्यान, परभणी-हिंगोली रस्त्यावरील आडगाव रंजे बुवा येथून काही अंतरावर ढवूळगाव येथे बाराशिव कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर हे वाहन जोरात धडकले. हा अपघात एवढा भयंकर होता की, वाहनात बसलेल्या मजुरा पैकी एक महिला रस्त्यावर पडली. यात तिचे डोके रस्त्यावर जोरात आदळल्याने अति रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सात जण पडल्याने गंभीर जखमी झालेले आहेत.