हिंगोली -दिवसेंदिवस आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे, अशा परिस्थितीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. मात्र आता आरोग्य विभागाने कात टाकली असून ग्रामीण भागात असलेल्या रुग्णालयांमध्ये विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आता उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी तर जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हिंगोली येथे केली. या घोषणेमुळे खरोखरच ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. सोबतच वर्ग 'क' आणि 'ड' ची परीक्षा घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे हे हिंगोली येथे खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांनी आरोग्य विभाग हे रुग्णांसाठी कशाप्रकारे धडपड करते तसेच कोरोना महामारीच्या काळामध्ये किती जिद्दीने काम केले याची पत्रकार परिषदेत माहिती दिली. तर ग्रामीण भागातील रुग्णांची सध्याच्या विविध आजाराने चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यामुळे ही धावपळ कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणे हे आवाक्याबाहेर असते. अशातच सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय या महागड्या तपासण्या करण्यासाठी सर्वसामान्यांना आर्थिक अडचण भासते. त्यामुळे अनेक जण ही तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. अन् आजार हा वाढत जातो. अशातच काही रुग्णांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आता आरोग्य विभागाने विविध योजना सुरू करत कात टाकली आहे.
हे ही वाचा -गडचिरोलीतील सूरजागड लोह खनिज प्रकल्पाला मजूर पुरवठा करणाऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या
डॉक्टरांची भरती करणार -
सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा स्टार हा अतिशय कमी आहे. त्यामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी अनंत अडचणी निर्माण होत आहेत. डॉक्टरांची भरती २५ अन् २६ सप्टेंबर रोजी हमखास केली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच रुग्णांची होणारे गैरसोय टाळण्यासाठी मदत होईल. मुख्य म्हणजे या सर्व सुविधांमुळे रेफर रुग्णांची संख्या ही कमी होण्यास मदत होईल.
वर्ग क अन ड ची दोन दिवस होणार परिक्षा -
आरोग्य विभागामध्ये वर्ग हे देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. मात्र महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यात वर्ग क आणि ड ची पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे देखील आरोग्य यंत्रणेला अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. हीच बाब लक्षात घेऊन येत्या २५ आणि २६ सप्टेंबर रोजी या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक राहणार असून या परीक्षेमध्ये कुणीही कुणाच्या अफवेला बळी पडायचे नाही. याबाबत कुठे शंका आली तर महाराष्ट्रातील स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करावी. त्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.