हिंगोली- जिल्ह्यातील पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. एकही सरकारी अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले नाही. यामुळे येथील शेतकरी चिंतेत होते. दरम्यान, आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे येणार असल्याची माहिती मिळताच आपल्या व्यथा मांडण्यासाठी बांधावर शेतकरी उभे होते. त्या ठिकाणी एक लहानगाही उन्हात राजकीय नेत्याची प्रतीक्षा करत होता.
शिवम सुनिल कुटे, असे या मुलाचे नाव असून तो देखील आपल्या वडिलांसोबत आपल्या शेतामध्ये येणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची प्रतीक्षा करत थांबला होता. आमच्या शेतातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे माझ्या वडिलांना काहीही सुचत नाही आता आमचे वडील शेतीसह घरचा खर्च कसा भागवतील याच चिंतेत राहतात. त्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळावी आणि माझ्या वडिलांना या संकटातून बाहेर काढावे, या अपेक्षेसह हा चिमुकला शेतात थांबला होता.