हिंगोली - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे पाहून पूर्वी हिंगोलीकरांचा आनंद गगनात मावेनासा होत होता. मात्र, आता अचानकपणे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाहून नागरिकांची झोपच उडाली आहे. शनिवारी सकाळपासून प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या अहवालात दिवसभरात 50 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अक्षरशः जिल्हा पुन्हा हादरून गेला आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची 151 एवढी नोंद झाली असून, 89 हे बरे झालेले आहेत. तर, आता 65 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा आकडा पुन्हा वाढत चालला आहे. मुंबई येथून ओंढा ना. तालुक्यात आलेल्या एका व्यक्तीसह वसमत तालुक्यातील पाच असे सहाजण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला होता. तर, प्राप्त झालेल्या अहवालात सेनगाव तालुक्यातील 13 अन हिंगोली येथील लिंबाळा सेंटरमध्ये असलेल्या 31 व्यक्ती असे एकूण 44 जण कोरोनाबाधित असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण नव्याने आढळल्याने, हिंगोलीकरांची अक्षरशः झोप उडाली आहे. तर, पुन्हा एकदा प्रशासनही खडबडून कामाला लागले आहे. वास्तविक पाहता हिंगोली येथील एका सफाई कर्मचाऱ्याचा अन कळमनुरी तालुक्यातील कामठा येथील एका व्यक्तीच्या मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली असताना पुन्हा नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे हिंगोली जिल्हा आता चांगलाच हादरुन गेला आहे.