हिंगोली- शहरात वाहतूक शाखेने मागील पाच-सहा दिवसांपासून टोइंग करून रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काही युवकांना रोजगार तर उपलब्ध झाला आहे आणि रस्त्याने देखील मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, शहरात पालिकेने पार्किंगची व्यवस्थाच केलेली नसल्याने याचा मनस्ताप दुचाकीस्वारांना सोसावा लागत आहे.
दुचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सरसावले आहेत. कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे वाहन तळाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांनी विविध कार्यालयांना निवेदन दिले आहे. हिंगोली शहरात रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी उचलून दुचाकीच्या मालकाला दंड लावण्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य चांगलेच वैतागून गेले आहेत. त्यामुळेच आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्किंगसाठी सरसावले आहेत.
वाहतूक शाखेने जे कार्य सुरू केले आहे ते कौतुकास्पद आहे. परंतु, शहरात पालिकेने वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्थाच नसेल तर वाहने पार्क करावी तरी कुठे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत नगर पालिका हिंगोली शहरात पार्किंगची व्यवस्था करत नाही, तोपर्यंत दुचाकीस्वारांना कोणताही दंड न आकारण्याची मागणी राष्ट्रवाटी निवेदनाद्वारे केली.