हिंगोली - 'आमच्या आज्याचा व्यवसाय शेती, वडिलांचा व्यवसायसुद्धा शेती अन् आमचाही शेती. मग आम्ही सर्व शेतकरी असताना आम्हाला एक वर्षीचा दुष्काळ का सहन होऊ नये, मुख्यमंत्री साहेब तुमच्या व्यवस्थेने आमच्या सर्व चिंधड्या-चिंधड्या केल्या आहेत, वरून विज वितरण कंपनीच्या लाईनमनने तर वीज कट करून अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने जगण्यात आता काही अर्थच उरला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब मला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या', अशी मागणी एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
हिंगोलीतील शेतकरी नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे नामदेव पतंगे (रा. ताकतोडा जि. हिंगोली), असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्याच्या परिस्थितीचे वास्तव डोळ्यासमोर ठेऊन पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये यंत्रणा कशा प्रकारे जनतेला व शेतकऱ्यांना हैराण करून सोडते आहे, तसेच बँक कर्मचारी देखील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी कशा प्रकारे टाळाटाळ करतात. यातून शेतकऱ्यांचे वाढते नैराश्य आणि या एवढ्या भयंकर परिस्थितीत शासनाकडून मिळणारे तोडके अनुदान, या सर्वांचा ताळमेळ लावत लावता सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत, असे पतंगे यांचे म्हणणे आहे.ही परिस्थिती माझी एकट्याची नव्हे - वीज बिलाअभावी शेताततील वीज जोडणी तोडण्यात आली आहे. त्यामुळे गुरे पाण्याविना तडफडत आहेत तर, दुसरीकडे शेती पिकांना देखील पाणी देता येत नाही. त्यामुळे डोळ्यांसमोर उभे पीक वाळून जात आहेत. त्यामुळे नेमके जगावे कसे? हा प्रश्न माझ्याच नव्हे तर माझ्यासारख्या प्रत्येक शेतकऱ्या समोर उभा आहे, असे पतंगे म्हणाले आहेत.
अभागी शेतकरी म्हणून केला पत्रात नामोल्लेख -
नामदेव पतंगे यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्याला शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या आहेत. एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये शेतकरी कसा जीवन जगतो आणि तुमची यंत्रणा कशा प्रकारे त्या शेतकर्यांना त्रास देते. हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पत्राच्या शेवटी 'तुमचाच अभागी शेतकरी' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे हा शेतकरी सध्या चर्चेत आला आहे.
यापूर्वीही याच गावातील चिमुकलीने लिहिले होते पत्र -
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे गाव नेहमीच चर्चेत राहते. या गावातील शेतकरी नामदेव पतंगे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत आले आहेत. यापूर्वी देखील एका शेतकरी कन्येने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आम्ही दिवाळी निमित्त फटाके व कपडे खरेदी करू शकत नाही, असे पत्र लिहिले होते. हे पत्र देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता हे पत्र देखील व्हायरल झाले आहे.