हिंगोली- सेनगाव तालुक्यातील नानसी येथे १५ वर्षीय बालकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, प्रयोगशाळेतून आलेल्या शवविच्छेदन अहवालात या बालकाचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तब्बल तीन महिन्यानंतर ही घटना पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. शेख अरबाज शेख हुसेन (१५, रा. मंझरी जि. बीड) असे मृताचे नाव आहे.
किरण विठ्ठल सुखासे (१५, रा. नानसी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी किरण, साक्षीदार नितीन वाकळे आणि शेख अरबाज हे बामणी शिवारात असलेल्या पूर्णा नदी परिसरात ३० मे रोजी शेळ्या चरण्यासाठी गेले होते. मात्र, या ठिकाणी आरोपी किरण आणि अरबाज या दोघांमध्ये शेळ्या चरण्याच्या किवा इतर कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. यामध्ये आरोपी किरणने शेख अरबाजचा गळा दाबून खून केला होता. मात्र, या प्रकरणी सेनगाव पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.