हिंगोली -दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तरीही अनेकजण परिस्थिती गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे आता वाहतूक शाखेपाठोपाठ नगरपालिकाही अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मास्क न वापरणाऱ्यांना उठाबशा आणि अतिक्रमणधारकांना नोटिसा बजवण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क घालणे गरजेचे आहे. मात्र, बरेच मास्कचा वापर करत नसल्याचे आढळले. त्यामुळे मास्क न घालणार्यावर कारवाई करून, दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. त्यानुसार हिंगोली नगरपालिका आता मैदानात उतरली असून, शहरातील चौकाचौकांमध्ये आता नगरपालिकेचे कर्मचारी तैनात आहेत.
मास्कचा वापर न करणाऱ्यांना ताब्यात घेत, त्याच्याकडून दंड तर वसूल करीत आहेतच, त्यांना उठाबशा देखील काढायला लावत आहेत. मात्र, काही मास्क न वापरणारे विविध चौकांत थांबलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पळ काढण्यात समाधान मानत आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण नगरपालिकेच्या वतीने हटविण्यात येत आहे. एकाच वेळी दोन प्रकारच्या कारवाया नगरपालिका करत आहे. सकाळपासून 20 जणांवर कारवाई केली असून, 9 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर कारवाई कायम सुरू राहणार असून, प्रत्येकांनी आता घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले आहे.