ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मदर्स डे' स्पेशल..! परिचरिकांनीच दिला 'त्या' तिळ्या चिमुकल्यांना मायेचा ओलावा - 'मदर्स डे' स्पेशल

13 मार्चला तिळ्या मुलींचा जन्म झाला. तिन्ही मुलीच झाल्याने आई निराश झाली होती. या चिमुकल्या अतिदक्षता विभागात असल्याने आईच्या मायेची ऊब मिळणे शक्य नव्हते. मुली अतिदक्षता विभागात असूनही आई साधी पहायलाही आली नाही. रुग्णालयच त्या चिमुकल्यांचे आई-वडील झाले होते. तिन्ही चिमुकल्यांना परिचारिकांनीच मायेचा ओलावा दिला.

'मदर्स डे' स्पेशल
'मदर्स डे' स्पेशल
author img

By

Published : May 10, 2020, 10:25 AM IST

Updated : May 10, 2020, 1:05 PM IST

हिंगोली- जन्मानंतर 'त्या तिघी' आईपासून दूर गेल्या. तिघींनी एकाच आईच्या पोटी एकाच वेळी जन्म घेतला होता. तिळ्या जन्मल्यामुळे वजन कमी होते. श्वास घ्यायला त्रास होत होता. जन्मानंतर लगेचच त्यांना हिंगोलीतल्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवले. मात्र, तिन्ही मुली झाल्याने त्यांची आई पुन्हा त्यांच्याकडे फिरकलीही नाही. या तिन्ही चिमुकल्यांना परिचारिकांनीच मायेचा ओलावा दिला.

सुशीला संतोष शिंदे (रा. टाकळी ता. हिंगोली) यांनी 13 मार्चला तिळ्या मुलींना जन्म दिला. आई म्हणजे मायेचा सागर आहे. आईच सर्व काही आहे. मात्र, हे आईचं प्रेम दोन महिने त्या चिमुकल्यांना मिळालेच नाही. तिन्ही मुलीच झाल्याने आई निराश झाली होती. या चिमुकल्या अतिदक्षता विभागात असल्याने आईच्या मायेची ऊब मिळणे शक्य नव्हते. मुली अतिदक्षता विभागात असूनही आई साधी पहायलाही आली नाही. रुग्णालयच त्या चिमुकल्यांचे आई-वडील झाले होते.

सलग तीन महिने रुग्णालयात त्या चिमुकल्यांवर उपचार करत असताना त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क साधला जात होता. मात्र तिकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी परिचारिकांनीच पोटच्या गोळ्याप्रमाणे त्या तिघींना मायेचा ओलावा दिला. दरम्यान, एका चिमुकलीला श्वास घेण्यासाठी जास्तच त्रास होऊ लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरीही, कोणीही नातेवाईक तिकडे फिरकले नसल्याचे परिचरिकांनी सांगितले. त्या चिमुकल्यांसाठी दिवसरात्र राबणाऱ्या परिचारिकांनी या बाळांना जीव लावला. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या चिमुकल्या जणू मायेच्याच कुशीत आहेत, असे प्रेम परिचारिकांनी दिले. त्यांना वाचवण्यासाठी डॉ. दीपक मोरे, डॉ. शंकर पोले, डॉ. स्वप्नील गिरी, डॉ. चौधरी, प्रभारी देशमुख आदींनी प्रयत्न केले.

अनेकदा संपर्क साधून देखील आई-वडील आले नाहीत. मात्र, रुग्णालयाने या मुलींवर उपचार करणे सुरूच ठेवले. दोन दिवसांपूर्वी आईचे वात्सल्य जागे झाले अन् चिमुकल्यांच्या आजीने रुग्णालयात धाव घेतली आणि आपल्या चिमुकल्या नातींना घेऊन ती घरी गेली. नेहमी अवती-भवती असणाऱ्या आणि काळजी घेणाऱ्या परिचरिकांनी त्या चिमुकल्यांना मोठ्या जड मनाने निरोप दिला. या परिचारिकांना आणि डॉक्टरांना 'मदर्स डे'निमित्त सलाम..!

Last Updated : May 10, 2020, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details