महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहितेची ऐशीतैशी : मुख्यमंत्र्यांच्या सभेत गर्दी जमविण्यासाठी वाहन चालकांसह कार्यकर्त्यांना मिळाले 'लक्ष्मीदर्शन'

आखाडा बाळापूर येथे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सभा घेण्यात आली. मुख्यमंत्री येणार असल्याने जास्तीत जास्त सभेत गर्दी दिसावी आयोजकाने खटाटोप केला.  सभेसाठी टाकलेला मंडप खचाखच भरावा यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे समोर आले आहे.

By

Published : Apr 13, 2019, 4:15 AM IST

Updated : Apr 13, 2019, 6:20 AM IST

कार्यकर्त्यांना हातोहात पैसे वाटप

हिंगोली- लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठी रणधुमाळी सुरू आहे. अशाच स्थितीत आखाडा बाळापूर येथे भाजप -शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी जाहीर सभा झाली. सभा संपल्यावर वाहने घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना हातोहात पैसे वाटप होत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

कार्यकर्त्यांना हातोहात पैसे वाटप

वाहनाला दोन हजार रुपये आणि कार्यकर्त्यांचा वेगळा खर्च, असा भरमसाठ खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे आखाडा बाळापूर येथे आचारसंहिता पथकाचा एकही कर्मचारी दिसून आला नाही.

आखाडा बाळापूर हे ठिकाण हिंगोली नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या ठिकाणी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सभा घेण्यात आली. मुख्यमंत्री येणार असल्याने जास्तीत जास्त सभेत गर्दी दिसावी आयोजकाने खटाटोप केला. सभेसाठी टाकलेला मंडप खचाखच भरावा यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे समोर आले आहे.

सभेसाठी येणाऱ्या जीपसाठी २ हजार रुपये तर मोठ्या वाहनासाठी ५ हजार रुपये -
सभेसाठी येणाऱ्या जीपसाठी २ हजार रुपये तर मोठ्या वाहनासाठी ५ हजार रुपये आणि कार्यकर्त्यांचा खर्च वेगळा करण्यात आल्याची शक्यता आहे. कारण सभा संपल्यावर वाहने घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना हातोहात पैसे वाटप होत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सभा संपताच वाहन चालक आमचे पैसे द्या, आमचे पैसे द्या, असा एकच कल्लोळ करीत होते. तर काही चालक दोन हजार रुपये मिळाल्याची खूण करून सांगत असल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकारामुळे मात्र आचारसंहितेचे धिंडवडे निघाले आहेत. याबाबत आचारसंहिता पथकाने कोणतीही कारवाई केली नाही.

बस्थानकात खासगी वाहनांची पार्किंग-

सभेसाठी आलेली वाहने आखाडा बाळापूर येथील बस्थानकात उभी केली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला तर स्थानकात येणाऱ्या बसला अडथळा येत होता. स्थानक परिसरात बस गाड्या कमी आणि सभेसाठी आलेल्या वाहनांचीच गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. एकंदरीत संपूर्ण प्रकारची आचारसंहिता पथकाने दखल घेऊन चौकशी केल्यास मोठा भांडाफोड होण्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणी आचारसंहितेचे एकही पथक उपस्थित नव्हते. हा खर्च निवडणूक विभागाकडे दाखविला जाईल का ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Last Updated : Apr 13, 2019, 6:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details