महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही विशेष: हिंगोलीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचा 'मोदकोत्सव' कोरोनामुळे रद्द

हिंगोली येथील गड्डेपिर गल्लीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात दरवर्षी मोदकोत्सव आयोजित करण्यात येतो. 1992 पासून सुरु झालेली मोदक वाटपाची परंपरा यावर्षी कोरोना मुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रमाकांत मिस्कीन यांनी दिली आहे.

Chintamani Ganpati temple
चिंतामणी गणपती मंदिर

By

Published : Aug 22, 2020, 5:37 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. हिंगोली शहरातील गद्देपीर येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात मोदकोत्सवाची परंपरा प्रसिद्ध आहे. मोदकोत्सवामध्ये अनेक भाविक सहभागी होतात. मात्र, 1992 पासून सुरु झालेली मोदक वाटपाची परंपरा यावर्षी कोरोना मुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रमाकांत मिस्कीन यांनी दिली आहे.

हिंगोली येथील गड्डेपीर गल्लीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मोदकोत्सव साजरा केला जातो. मोदकोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक हजेरी लावतात. त्यामुळे दिवसेंदिवस या मोदकोत्सवाची प्रसिद्धीही वाढत आहे. विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या लांबलचक रांगा लागतात. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे हिंगोली शहरातील सर्वच रस्ते हे गर्दीने फुलून जातात, असे चित्र गेल्या काही वर्षात पाहायला मिळत होते.

हिंगोलीतील मोदकोत्सव कोरोनामुळे रद्द

गौरी पूजन झाल्यानंतर या विघ्नहर्त्या चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक पहाटे तीन वाजल्यापासून रांगा लावतात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थानच्यावतीने चहा नाश्ता फराळाची व्यवस्था केली जाते. भाविकांमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय असते. मोदकोत्सव काळात मागील दोन-तीन वर्षापासून लाईव्ह दर्शनाची देखील व्यवस्था केली जातेय. या उत्सवामुळे हिंगोली शहरात पूर्णपणे भक्तिमय वातावरण निर्माण व्हायचे. मात्र, यावर्षी हा महोत्सव कोरोनामुळे रद्द करावा लागला आहे.

राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मोदकोत्सव रद्द केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली.

..अशी झाली मोदक वाटपास सुरुवात

हिंगोली शहरातील गड्डेपिर गल्लीतील रहिवासी अन संस्थांचे अध्यक्ष रमाकांत मिस्कीन हे 1991 मध्ये आपल्या कुटुंबियांसह पुणे येथील नातेवाईकांकडे गणेशोत्सव काळात गेले होते. त्यानंतर पुढील वर्षी 1992 मध्ये त्यांनी हिंगोलीत 1008 मोदक वाटप करण्यास सुरुवात केली. तेव्हा पासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरु आहे. मिस्कीन यांच्यांकडून मागील वर्षी 3 लाख मोदक स्वखर्चाने वाटप करण्यात आले होते. यावर्षी साडेतीन लाख मोदक वाटप केले जाणार होते. मात्र, कोरोना मुळे हा महोत्सव रद्द केला आहे. या उत्सवासाठी सचिव दिलीप बांगर यांच्यासह संस्थानचे सदस्य सहकार्य करतात, असे मिस्कीन यांनी सांगितले.

हिंगोलीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
गणेशोत्सव काळातील मोदकोत्सव म्हणजे हिंगोली करांसाठी एक पर्वणी असते. या महोत्सवासाठी परराज्यातून भाविक हजेरी लावतात. त्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थांनच्या वतीने काळजी घेतली जाते. एवढेच नव्हे तर डॉक्टर रांगेमध्ये थांबलेल्या भाविकांची मोफत तपासणी करतात. आपापल्यापरीने प्रत्येक जण भोजनाची व्यवस्था करतात. विघहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शेकडो भाविकांना दर्शन होईपर्यंत हिंगोली शहरातील नागरिक सहकार्य करायचे. मात्, यावर्षी सर्व काही कोरोनामुळे बंद राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details