हिंगोली -एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कळमनुरी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या ४ बसवर अज्ञातांनी दगडफेक केली, तर हिंगोली शहरातील ईदगाह मैदानाजवळील रस्त्यावर हिंगोली आगाराच्या मानव विकास बसवर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे हिंगोली आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
बस फोडल्याची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले, तर सुरक्षेचा उपाय म्हणून हिंगोली आगारात बसेस लावण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात आल्या नाही. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली, तर काही प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत होते. मात्र, भीतीपोटी खासगी वाहने देखील थांबवण्यात आली. त्यामुळे बाहेरगाववरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.