हिंगोली - शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असल्याचे हे सरकार घोकून-घोकून सांगत असले तरीही, कर्ज तर माफ झालेच नाही, मात्र कोणत्या बँकेतून माफ झाले हे त्यांच्या बँक शाखा व्यवस्थापकालाही कळेनासे झाले आहे. कर्जमाफी झालीच नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. तरीदेखील हे सरकार कर्जमाफी झाल्याचा दावा करत आहे. केवळ शेतकऱ्यांच्या अडचणी नव्हे तर सर्वसामान्यांच्या देखील अडचणी हे सरकार अजिबात जाणून घेत नाही. 21 ऑगस्ट रोजी आगमन होणाऱ्या 'शिवस्वराज्य' यात्रेतून ताकतोडा येथे जाहीर सभेत सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार असल्याचे आमदार रामराव वडकुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या वतीने 'शिवस्वराज्य' यात्रा काढली जात आहे. भाजप सरकार सत्तेत आले तेव्हापासून सर्वसामान्यांचे प्रश्न तर सोडाच शेतकऱ्यांच्या देखील अडी-अडचणी अजिबात सुटलेल्या नाहीत. वारंवार हे सरकार कर्जमाफीवर सर्वाधिक जास्त भर देते. मात्र, खरोखरच कर्जमाफी झाली का? किती लोकांना पुन्हा कर्ज मिळाले? किती लोकांचा शिक्षणाचा प्रश्न किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला? रोजगाराचा प्रश्न, वन्यप्राण्यांपासून अद्यापपर्यंत संरक्षण मिळाले का? अशा अनेक प्रश्नांना यात्रेच्या माध्यमातून वाचा फोडली जाणार आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करत सरकारकडे मागणी देखील केली जाणार आहे. खरे तर या सरकारने वेगवेगळे निर्णय घेऊन सर्वसामान्यांना भांबावून सोडले आहे. या सर्व विषयांच्या पार्श्वभूमीवर या यात्रेचे आयोजन करत ग्रामीण भागांमध्ये जाहीर सभा ठेवली आहे.
या जाहीर सभेमध्ये सर्वसामान्यांना बोलता यावे, त्यांना त्यांचे प्रश्न शांततेने मांडता यावेत हाच उद्देश असल्याने ही सभा गाव विक्रीस काढलेल्या ताकतोडा येथे ठेवण्यात आली असल्याचे वडकुते यांनी सांगितले. तसेच हिंगोलीत शासकीय विश्राम गृह येथे 22 ऑगस्ट रोजी युवा सवांद कार्यक्रम, तरुणींचा सहभाग वाढविण्यासाठी रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या यात्रेमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, खासदार अमोल कोल्हे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे वडकुते, दिलीप चव्हाण यांनी सांगितले. उशिरा का होईना पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या या यात्रेत खरोखरच किती शेतकरी उपस्थित राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.