हिंगोली- जिल्ह्यातील अनेक गावातील मजुरांना काम मिळत नाही. त्यामुळे मजुरांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे ओस पडली आहेत. मात्र, मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून वयोवृद्ध मंडळी चिमुकल्यांचा सांभाळ करीत असल्याचे विदारक चित्र कळमनुरी तालुक्यातल्या असोलवाडी येथे पाहायला मिळत आहे.
कामाच्या शोधात मजुरांचे स्थलांतर हेही वाचा-माजी क्रिकेटर अझहरुद्दीनसह तिघांवर औरंगाबादेत फसवणुकीचा गुन्हा दाखल
मजुरांना काम मिळत नसल्याने मजूर कुटुंबासह पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी धाव घेत आहेत. कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथे अशी परिस्थिती आहे. या गावची 700 ते 800 लोकसंख्या असून 100 टक्के आदिवासी बहुल गाव आहे. मुला-बाळांच्या शिक्षणाची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी घरातील वयोवृद्ध मंडळींना गावात ठेवल आहे. शासन मजुरांची भटकंती थांबवण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातच कामे उपलब्ध करून देत असल्याचा कागावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात काम उपलब्ध नसल्याने इच्छा नसतानाही मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे.
कामाच्या शोधात मजूर ऊस तोडीसाठी जात पोटाची खळगी भरत आहेत. असोलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांना हमीपत्र देऊन त्यांना मिळेल त्या शाळेत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे जवळपास 12 विद्यार्थ्यांना शाळेतून हमी पत्र दिले असल्याचे मुख्यध्यापक एस. एस. मोरे यांनी सांगितले. या ठिकाणी बऱ्याच लाभार्थ्यांना घरकूल मिळाले आहे. मात्र, वाळू अभावी घरकूल बंद पडलेल्या स्थितीत आहेत. येथील मजुरांना बाहेरगावी जाऊन काम केल्याशिवाय पर्यायच नसल्याचे येथील वयोवृद्ध मंडळी सांगतात. तर चिमुकले मोठा साहेब होण्याची स्वप्न उराशी बाळगून आपल्या आई-वडिलांच्या प्रतीक्षेत शिक्षण घेत आहेत.