हिंगोली- शहरातील एका दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मूल बाळ होत नसल्याच्या निराशेतूनच दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावला जात आहे. पूर्णा-नांदेड रोडवर पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. रमेश दत्तराव काचेवर (५२), रेखा रमेश काचेकर (४५) असे या दाम्पत्याचे नाव आहे.
रमेश काचेकर आणि त्यांची पत्नी रेखा काचेकर हे दोघे हिंगोली येथे एका भाड्याच्या खोलीत संसाराचा गाडा हाकत होते. दोघे पती-पत्नी तीन दिवसांपूर्वी शिर्डी येथे साई दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन करून परभणी येथे परतल्याचे मृत रमेश यांनी आपल्या हिंगोलीतील बंधू नागनाथ काचेकर यांना फोनद्वारे कळविले. सकाळी आम्ही पोहोचणार असल्याचे सांगितले, अन तेवढेच शब्द भावाच्या कानी पडले. त्यानंतर दुपारी दोघांचेही मृतदेह पूर्णा तालुक्यातील अडगाव परिसरात आढळून आल्याची माहिती मिळाल्याचे मृताचे बंधू नागनाथ काचेकर यांनी दिली. मृतदेहा शेजारी विषारी औषधाची बाटली आढळून आली.