हिंगोली -राज्यभरातून मराठा आरक्षणाची मागणीला जोर वाढला आहे. असे असताना जिल्ह्यातील सेनगाव येथे मराठा शिवसैनिक सेनेच्यावतीने सेनगाव तहसील कार्यालयावर मराठा आरक्षण व ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बैलगाडी मोर्चा काढला. मोर्चात सेनगाव तालुक्यात शेतकरी 40 बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी तहसीलचा परिसर दणाणून गेला होता.
मराठा शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे यांच्या नेतृत्वाखाली सेनगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सध्या, शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने चांगलाच हताश झालेला आहे. अशातच आरक्षणही न मिळाल्यामुळे मराठा समाज हा चांगलाच गोंधळात पडलेला आहे. त्यामुळेच सेनगाव येथे मराठा शिवसैनिक सेनेच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये सेनगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा आरक्षणसह ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी हिंगोलीत बैलगाडी मोर्चा
राज्यभरात मंगळवारपासून मराठा आरक्षणासाठी मराठा संघटना आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वीच सेनगावमध्ये शिवसैनिक सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या आप्पास्वामी गेटपासून मोर्चाला सुरुवात झाली. एक मराठा लाख मराठा व आरक्षण आमच्या हक्काचे अशा वेगवेगळ्या घोषणाबाजीने सेनगाव तहसीलचा परिसर दणाणून गेला होता. जिल्ह्यात खरिपाची सर्वच पिके ही पाण्याखाली गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हा पूर्णपणे हिरावून गेला आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून मराठा आरक्षण द्यावे. अन्यथा, कोणतीही भरती प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे.
मंगळवारी संपूर्ण राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन केले जाणार आहे. त्या आंदोलनातही मराठा शिवसैनिक सेना सहभागी होणार असल्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे यांनी सांगितले. तर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडावी अशी मागणीही भिसे यांनी केली आहे.