हिंगोली - एका अल्पवयीन युवतीची चंद्रपूर येथून सुटका होते न होते तोच एका महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत महिला व तरुणी खरोखरच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील कानडखेडा बु. येथील आदिवासी समाजाच्या मुलीला गुंगीचे औषध देऊन, अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. आरोपीचे एवढ्यावरच समाधान झाले नाही तर, त्याने पीडितेला चंद्रपूर येथे विक्रीसाठी नेली होती. मात्र, तिच्या नातेवाइकांनी ताबडतोब गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन, मुलगी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर त्या तरुणईची गोरेगाव पोलिसांनी सुटका केली. त्याच पाठोपाठ आता सेनगाव तालुक्यातील जमठी बु. येथे महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपीने घरात शिरून महिलेचा विनयभंग केला. या प्रकाराने गावात खळबळ उडाली असून, पीडितेच्या फिर्यादीवरून गोरगाव पोलीस ठाण्यात विनयभंग व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव पांडुरंग शिंदे असे आरोपीचे नाव आहे. विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. शिवाय महिला अत्याचार प्रकरणात हलगर्जीपणा केल्यास त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.