हिंगोली- निसर्ग बदलामुळे शेती करणे फारच जिकरीचे होऊन बसले आहे. अधूनमधून कधी अति पर्जन्यमान तर कधी कमी पर्जन्यमान होत असल्याने, पारंपरिक घेतलेल्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. वातावरण बदलामुळे शेतीतून भांडवली खर्च देखील निघत नसल्याची सद्यस्थितीत परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हे फेडायच्या चिंतेने अनेक शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र जर डोकं लावून शेती केली तर आत्महत्या करण्याची अजिबात वेळ येणार नसल्याचे भांडेगाव येथील शेतकऱ्यांने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
बळीराम जगताप असं या शेतकऱ्याचं नाव आहे. बळीराम यांनी गेल्या पाच ते सहा वर्षापासून पारंपरिक पिकाला बगल दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कांद्याचे बियाणे घेऊन जगताप गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी एका महिला शेतकऱ्याकडे भेट देऊन शेतीची पाहणी केली. तर कमी वेळात कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे, पीक त्या शेतीमध्ये आढळून आले. तेव्हापासून त्यांनी आगळी वेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि पारंपरिक पिकाला साफ बगल दिली. त्यांनी शेतामध्ये भाजीपाला वर्गीय पिके घेण्यास सुरवात केली. यामध्ये सर्वप्रथम सिमला मिरचीची शेडमध्ये लागवड करून तिच्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. विशेष म्हणजे केवळ वीस गुंठ्यातही शिमला मिरचीची लागवड केलेली आहे. या मिरचीला जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे जगताप सांगतात.