हिंगोली -विधानसभेसाठी काँग्रेसने ५६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून हिंगोलीसाठी सलग तीन पंचवार्षिक आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपकडून हिंगोली मतदार संघासाठी विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, वंचितकडून अजून उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी लोकसभेत चांगली मते मिळाल्याने वंचित कुणाला तिकीट देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विविध पक्षाचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. हिंगोली विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर तर भाजपकडून तान्हाजी मुटकुळे हे निवडणूक रिंगणात पुन्हां उमेदवार राहतील अशी दाट शक्यता आहे. अजून तरी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र मुटकुळे हे जोमाने कामाला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या दोन उमेदवारां व्यतिरिक्त हिंगोली विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून तगडा उमेदवार देण्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे वंचितचा उमेदवार कोण? कोणाच्या नावावर शिकामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.