हिंगोली - जिल्ह्यात सलग ४ ते ५ दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी हजेरी लावलेल्या पावसाने हिंगोली येथे हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातील हळद पूर्णतः भिजली. कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर रांगा लावलेल्या वाहनातील हळद झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. तर मालगडीने हिंगोलीत दाखल झालेले २०:२०:० दहा हजार क्विंटल खत ही भिजल्याचा प्रकार घडला.
हिंगोलीत वादळी पावसामुळे शेतमालासह खत भिजले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - वादळी वारा
शनिवारी हजेरी लावलेल्या पावसाने हिंगोली येथे हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातील हळद पूर्णतः भिजली.
संत नामदेव हळद मार्केट मध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या रांगा लावून, नंबर प्रमाणे वाहने यार्डात सोडली जातात. त्यामुळे दुपार पासूनच हळद मार्केट परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. या रांगा एवढ्या कधी कधी शासकीय विश्रामगृहापर्यंत तर दुसऱ्या बाजूने रेल्वे स्टेशनमागील मोकळ्या परिसराने भरून जातात. अशीच परिस्थिती शुक्रवारी होती. पाऊस आल्यामुळे लांबलचक रांगेत थांबलेल्या शेतकऱ्यांनी आप-आपल्या वाहनातील हळद झाकून ठेवण्यासाठी घाई करत होते. या पावसामुळे शेतकऱयांचे खूप नुकसान झाले.
पावसामुळे हळद मार्केटमध्ये असलेली हळद भिजली. खरीपाची पेरणी तोंडावर असल्याने, शेतकरी हळद विक्रीसाठी धडपड करीत आहेत. मात्र, पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडविली. हळद भिजल्याने हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असल्याचे काही शेतकरी सांगत होते. तर दुसरीकडे रेल्वेने आलेले हिंगोली रेल्वेस्थानकावर खत देखील भिजले. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवले आहे.