हिंगोली -कोरोनाच्या महासंकटाचा सर्वांनाच मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. तर अनेक जणांचे व्यवसायच ठप्प झाले. यामुळे हजारोंवर उपासमारीची वेळ आली.
याच कोरोनाचा फटका येथील एका गायकाला देखील बसला आहे. कोरोनामुळे या गायकावर आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रत्येक घटकला फटका बसला आहे. कित्येक जणांना तर हाताला काम मिळाले नसल्याने, एक वेळच्या जेवणाचेही वांधे होऊन बसले आहेत. विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घटलेली असल्याने, कलाकार, गायकांवर अक्षरशः उपास मारीची वेळ येऊन ठेपली आहे. तरीही खचून न जाता एका गायकाने कोरोना जनजागृती ही गीतातून केली आहे. सोपास खडसे असे या गायकाचे नाव आहे.
हिंगोली येथील गायक सोपान खडसे अनुभव कथन करताना. खडसे यांना अगदी लहानपणापासूनच गायनाची फार आवड होती. ते त्यांनी सत्यात उतरवली. गेली अनेक वर्षे भजन आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गीत गायन करून यामधून मिळालेल्या रकमेतून ते संसाराचा गाडा हाकत होते. मात्र, कोरोनाच्या महासंकटाचा त्यांनाही फटका बसला. त्यांना टिकास, फावडे, कोयता घेऊन, मिळेल ते काम करावे लागत आहे. शे- दोनशे रुपये मिळालेल्या रक्कमेतून हा गायक आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी धडपड करत आहे. गल्लोगल्ली गल्ली फिरून गीत गाऊन स्वतःची पुस्तक-विक्री करणारा गायक आज काम मिळवण्यासाठी भटकंती करत आहे. काम करता करता ते गीत गातात. शासकीय कार्यक्रमातही ते गीत गायन करतात. मात्र, आता जनजागृती ही फलकाद्वारे केली जात असल्याने गीत गायन हे बंद झाले आहे. त्यामुळे खडसे यांच्यावर वाईट अवस्था आली आहे.
खडसे यांचे आतापर्यंत जवळपास 17 ते 18 गाण्याचे पुस्तक प्रकाशित झाले आहेत. मात्र, गीतावर हातवारे करणारे हात आता कामासाठी राबत आहेत. त्यामुळे शासन स्तरावर खरोखरच या गायकांसाठी काही मदत झाली तर खडसे यांच्यासारखे अनेक गायक अडचणीतून मुक्त होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.