हिंगोली -जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी दुपारी रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी खरीप पिके हातची जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस विविध भागात हजेरी लावत असल्याने पिकांना आधार मिळाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यंदाचा हंगाम पूर्णत: कोरडा ठाण गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मध्यंतरी पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि त्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या आटपून घेतल्या होत्या. मात्र, पावसाने दांडी मारल्याने जमिनीबाहेर आलेली पिके पूर्णत: करपली.
मागील काही दिवस पाऊसच नसल्याने दुपारच्या वेळी पिके माना टाकत होती. त्यामुळे बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी पिकांची कोळपणी देखील थांबवली होती. मात्र, दोन दिवसांपासूनच्या रिमझिम पावसाने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने आपल्या पिकांची कोळपणी करून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात सलग ३ ते ४ वर्षांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. मोठ्या प्रमाणात होणारे उत्पन्न निर्सगाच्या अवकृपेमुळे आता रोडावले आहे. हाती आलेल्या उत्पादनातून भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. त्यामुळे यंदाची परिस्थितीही अशीच असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.