हिंगोली- कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते. रोगाने आधीच बेजार झालेल्या रुग्णांची प्रकृती बरी होण्यासाठी औषधोपचारासोबतच सकस आहाराची देखील आवश्यक्ता असते. मात्र, याकामात हलगर्जी झाल्याचे दिसून आले आहे. हिंगोली येथील अंधरवाडी परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलेल्या भोजनात अळ्या निघाल्या आहेत.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना जेवण देण्यात येते. आतापर्यंत लहान-सहान तक्रारी वगळता, जेवण उत्कृष्ट देण्यात आले आहे. मात्र, आता हळूहळू जेवणासंबंधी तक्रारी वाढत असून आता तर अंधरवाडी परिसरात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलेल्या भोजनात चक्क अळ्या निघाल्याचे समोर आले आहे. भोजनात अळ्या निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची दखल हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी घेतली. त्यानंतर प्रकरणाची चौकशी केली असता त्यात सत्यता आढळून आली. यानंतर ताबडतोब जेवणाचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले.