हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील करवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध म्हणून लोकसभा निवडणुकीवर १००% बहिष्कार टाकला. गावातील एकाही मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला नाही. एवढे करूनही प्रशासन लक्ष घालत नसेल तर आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास घेणार असल्याचा इशारा या मतदारांनी दिला.
करवाडी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, रस्ता नसल्याने प्रशासनाचा निशेध - resident
प्रशासन जर आमच्या मरणाची वाट पाहत असेल तर आम्ही स्वतःहून प्रशासनासमोर जाऊन त्यांना इच्छामरणाची परवानगी मागणार असल्याचे करवाडी ग्रामस्थांनी सांगितले.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही एखाद्या गावाला जर रस्त्यासाठी प्रशासनासमोर नतमस्तक व्हावे लागत असेल, तर यावरूनही दुसरे मोठे दुर्दैव कोणते ? मतदान हा हक्क आहे, मात्र तो बजावूनही जर कोणता न्याय मिळत नसेल तर मतदान करायचे तरी कशाला ? असा सवाल करत करवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. जवळपास पावणे दोनशे मतदार संख्या असलेल्या करवाडी येथील ग्रामस्थांना अद्याप रस्ता नाही. येथील महिलांना प्रसुतीसाठी आजही खाटेवरच नेण्याची वेळ आहे. एवढेच नव्हे तर गाव कुठे आहे हे शोधत शोधत यावे लागते. अनेकदा प्रशासनासमोर निवेदने, अर्ज, उपोषण, मोर्चे केले. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाला पाझर फुटलेला नाही. त्यामुळेच लोकशाहीच्या उत्सवात येथील मतदारांनी मतदान न करता मतदानावर बहिष्कार टाकलेला.
ऐन उन्हाळ्यात गावाला जाण्यासाठी जर एवढा अडचणीचा सामना करावा लागत असेल तर पावसाळ्यात येथील ग्रामस्थांची किती वाईट अवस्था असेल, हे या रस्त्याच्या परिस्थिती वरून दिसून येते. विशेष म्हणजे लोकशाहीचा एवढा मोठा उत्सव असताना एकाही राजकीय पुढार्याने साधे या गावाकडे वळून देखील पाहिलेले नसल्याची खंत येथील मतदारांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली. मतदानावर बहिष्कार टाकल्याचे येथील ग्रामस्थ मोठ्या तिडकीने सांगत होते. प्रशासन जर आमच्या मरणाची वाट पाहत असेल तर आम्ही स्वतःहून प्रशासनासमोर जाऊन त्यांना इच्छामरणाची परवानगी मागणार आहोत. परवानगी मिळताच आम्ही आमच्या मुलांसह प्रशासनासमोरच आत्महत्या करणार आहोत शेवटचा हाच पर्याय आता आपल्यासमोर उरल्याचे ते म्हणाले.