हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील कांडली परिसरात मंगळवारी दुसऱ्यांदा बिबट्या आढळून आला आहे. या घटनेने परिसरातील शेतकरीही भयभीत झाले असून, या बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडून सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. यापूर्वीदेखील या परिसरात बिबट्या आढळून आला होता. तेव्हापासूनच या भागातील शेतकरी हे भयभीत झाले होते.
मंगळावारी कांडली येथील देविदास नरवाडे यांच्या शेतामध्ये हा बिबट्या आढळून आला. नरवाडे दाम्पत्य शेतामध्ये काम करीत असताना अचानक त्यांची नजर बिबट्यावर पडली. त्यामुळे दोघे चांगलेच घाबरून गेले होते, ही बाब त्यांनी गावातीलच राहुल पतंगे यांना कळविली. पतंगे यांनी ताबडतोब वनविभागाला माहिती दिली.
घटनास्थळी तात्काळ झाले पथक दाखल-
बिबट्या असल्याची माहिती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वनपाल प्रिया साळवे, नरसिंग तोलसरवार, केंद्रे, फड, कचरे या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. आता हा बिबट्याच आहे का याची तपासणी केली जात आहे. वन विभागाचे पथक कांडली शिवारात दाखल झाल्यानंतर त्यांनी बिबट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता, शेतालगत असलेल्या सोपानराव देशमुख यांच्या विहीर परिसरात बिबट्याचे ठसे उमटलेले आढळून आले.
बिबट्याच्या घेतला जातोय परिसरात सर्वत्र शोध-
कांडली परिसरात आढळून आलेल्या बिबट्यामुळे शेतकरीवर्ग हा चांगलाच भयभीत झालेला आहे. सध्या रब्बीचा हंगाम हा जोरात सुरू असून शेतकरी रात्री-अपरात्री गहू, हरभरा पिकांना पाणी देण्यासाठी झगडत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये आज या भागात बिबट्या आढळून आल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करेपर्यंत शेतकऱ्यांनी बिबट्याचा आढळून आला त्या भागात जाण्याचे टाळावे, तसेच सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.