हिंगोली - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बोगस डॉक्टरांचा ( Bogus doctor ) सुळसुळाट वाढला आहे. विशेष म्हणजे बोगस डॉक्टरांच्या रुग्णालयाचे उद्घाटन आरोग्य अधिकाऱ्याच्या हस्तेच झाले. मात्र, हे डॉक्टर बोगस असल्याचे निमा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत ( Complaint to the Collector ) म्हटले आहे. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
निमा संघटनेचा आरोप - सेनगाव येथे ह्रदयेश नावाच्या रुग्णालयाचे काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. निमंत्रण पत्रिकेवर आमदार आणि आरोग्याधिकाऱ्यांची नावे छापण्यात आली होती. हा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला, परंतु ज्या रुग्णालयाचे उद्घाटन झाले त्याचे डॉक्टर्स बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरांची कागदपत्रे बोगस असल्याचे निमा संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
रुग्णांच्या आरोग्याशी खेळ - हिंगोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून ते रुग्णांच्या आरोग्याशी खेळत ( Playing with patients health ) असल्याचे दिसत आहे. या हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात विविध सुविधाही देण्यात येत आहेत. या सुविधांमुळे रुग्ण या हॉस्पिटल्समध्ये जात आहेत. मात्र, त्यांच्या आरोग्यालाच यातून धोका निर्माण होत आहे. दरम्यान, हृदयेश रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांकडे डिग्री नसल्याचे निमा संघटनेने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.