हिंगोली - वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे शुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर मृतदेह जाळून टाकत नाल्यांमध्ये फेकून दिल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. दिसायला सुंदर नाही तसेच काही काम करत नाही असे म्हणत, पतीने पत्नीला संपविले. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
संगीता रामा मारकळ अस मृत महिलेचे नाव आहे. कळमनुरी तालुक्यातील झरा येथील नानाराव भुरके यांच्या संगीता नावाच्या मुलीचा पांगरा शिंदे येथील रामा बाबुराव मारकळ यांच्याशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सुरुवाती पासून त्यांचा संसार अतिशय सुरळीत सुरू होता. त्यांना दोन अपत्ये असून मागील दोन महिन्यापूर्वी संगीता यांना मुलगी झाली. त्यामुळेच याचा राग मनात धरून संगीता यांना सासरकडील मंडळी त्रास देऊ लागली. ''तु दिसायला अजिबात चांगली नाहीस', तसेच ''तुला स्वयंपाक देखील येत नाही' असे वेगवेगळी कारणे लावून, तिच्यासोबत नेहमीच वाद घातला जायचा. संगीताला रामा याने तर थेट मारून टाकण्याची धमकी देखील दिली होती. मात्र आज ना उद्या आपल्या पतीमध्ये बदल होईल? या आशेने संगीता ही बाब आपल्या माहेरकडील मंडळीला कळवत नसे. शेवटी दोघांमधील वाद हा विकोपाला गेला आणि गुरुवारी सायंकाळच्या सुमारास संगीताला पतीने रागाच्या भरात संपवून टाकले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुरावा नष्ट करण्यासाठी केला हा बहाना-
आपण केलेले कृत्य कुणाला कळू नये म्हणूनच पती रामाने संगीताचा मृतदेह अर्धवट जाळून टाकला. अन नाल्यांमध्ये फेकून दिला. घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी कुरूंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर यांच्यासह पथकाने धाव घेतली. मृतदेह संगीता रामा मारकळ यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीने दिली खून केल्याची कबुली-
संगीता यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, संगीता यांचा पती रामा मारकळ याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता. त्याने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गोपींनवार हे करीत आहेत.
पांगरा शिंदेत शुल्लक कारणावरून पतीने पत्नीला पेटविले - पतीने पत्नीला पेटविले
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे शुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा खून केला.