हिंगोली -अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 8 लाख 43 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. वसमत येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग अंतर्गत असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आलेल्या कारवाईत हे घबाड हाती लागले आहे. त्यामुळे सरकारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या गोडाऊनचा या प्रकारे वापर होत असल्याचे संबंधित कारवाईत समोर आले आहे.
हिंगोलीत नऊ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 8 लाख 43 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सरकारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या गोडाऊनचा या प्रकारे वापर होत असल्याचे संबंधित कारवाईत समोर आले आहे.
खालिद शेख यांच्या मालकीचे हे गोडाऊन असून ते सध्या मुझाहेद खान नशीब खान पठाण यांना भाड्याने देण्यात आले आहे. यामध्ये अनेक दिवसांपासून गुटखा साठवण्यात येत होता.
संबंधित कारवाईत 4 मार्च 2017 ला दिलेल्या आदेशान्वये हे गोडाऊन सील करण्यात आले आहे. तर अन्य कारवाईत याच ठिकाणी भागवत बाबुराव मारकोळे यांच्या घरात तपासणी केल्यानंतर 8 हजार 140 किंमतीचा गुटखा तसेच पानमसाला आढळला. या दोन्ही करवाईमध्ये 8 लाख 43 हजार 468 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
तर दोन्ही ही कारवाईत मुझाहेद खान नसीब खान पठाण, भागवत बाबुराव मारकोळे या दोघांवर अन्न सुरक्षा तसेच भा.दं.सं कायद्यानुसार वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह-आयुक्त वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुराधा भोसले, प्रकाश कच्छवे, अरुण तमडवार यांनी संबंधित कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा पथकाच्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.