हिंगोली - दर वर्षीची पाणीटंचाई ही हिंगोली जिल्ह्याच्या पाचवीलाच पुजलेली आहे. यंदाही जिल्ह्यातील बऱ्याच गावातील विहिरीत उतरून पाणी भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आल्याचे भयंकर चित्र आहे. पाणी न मिळण्याच्या भीती पोटी ग्रामस्थ टँकरवर चढून जीवाची पर्वा न करता पाण्याचे पाईप टाकत आहेत. शहरी ठिकाणी तर नळाचे पाणी कोणी नेऊ नये म्हणून चक्क कुलूप लावण्याचा फंडा वापरला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात याही वर्षी अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आज जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे, एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री जीवावर उदार होऊन ग्रामस्थ पाण्यासाठी विहिरीत उतरत असल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी, माळसेलु, डिग्रस कराळे, डिग्रस वाणी आधी गावात भीषण पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. बऱ्याच गावातील ग्रामस्थ केवळ पाणी टंचाईला कंटाळून शहरी ठिकाणी वास्तव्यास आले आहेत. तर काहींनी कामानिमित्त बाहेरगावी धाव घेतली आहे. बऱ्याच गावांमध्ये उरली ती केवळ वयोवृद्ध मंडळी त्यांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. नुकतीच लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली असून, पाणीटंचाई निवारणासाठी अधिकारी कर्मचारी कामाला लागले आहेत. सध्या हिंगोली जिल्ह्यातील २३ गावांची मदार ३४ टँकरवर अवलंबून आहे. तरीही प्रशासनाच्या वतीने प्रस्ताव आलेल्या गावात स्थळपाहणी केली जात आहे. त्यामुळे टँकरची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे.