हिंगोली - मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून एकमेव गणाजी बेले यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे मनीष आखरे यांची बिन बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा हिंगोली येथील जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम राहिली.
पुन्हा एकदा हिंगोलीच्या जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीचा झेंडा - news about Congress, ncp and Shiv Sena
हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम राखण्यात जिल्ह्यातील नेत्यांना यश आले आहे.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेवर यापूर्वीही महाविकास आघाडीची सत्ता होती. सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी सर्व जण कामाला लागले होते. त्यानुसार आज शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी गणाजी बेले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. राष्ट्रवादीकडून मनीष आखरे आणि यशोदा दराडे यांचे दोघांचे अर्ज आले होते. मात्र, यशोदा दराडे यांनी माघार घेतल्यामुळे मनीष आखरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर जिल्हा परिषद परिसरात जल्लोष करण्यात आला. काँग्रेसला केवळ सभापतीपद हवे असल्यामुळे काँग्रेसने उपाध्यक्षपदात कोणताही रस दाखवला नाही. मात्र, सर्वांचे लक्ष्य असलेल्या हिंगोली येथील जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीने विजय प्राप्त केल्याचे समोर आले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांनी काम पाहिले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी नितीन दाताळ यांनी सहकार्य केले. यावेळी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे, संतोष टारफे, भाऊराव पाटील गोरेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.