हिंगोली- शहर वाहतूक शाखेत नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्यामुळे वाहतुकीला शिस्त लागत आहे. मात्र, वाहतूक शाखेचे कर्मचारी बेशिस्त झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस कर्मचारी वाहन चालकांना कारवाई करताना चक्क शिव्या देत आहेत. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली येथील वाहतूक शाखेत पो.नि चिंचोळकर रुजू होताच बेशिस्त चालकांवर कारवाईचे प्रमाण वाढले. तसेच यातून लाखो रुपयांचा दंडही वसूल झाला आहे. मागील ६ मार्चपासून तर वाहन चालकांना पोलिसांनी भांबावून सोडले आहे. परंतु, ही कारवाई करताना पोलीस आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरुन चालले आहेत. एका दुचाकी चालकाने उलट प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर द्यायचे सोडुन या पोलीसाने त्याला शिवीगाळ केली. दुचाकीस्वाराच्या खिशाला असलेल्या कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे.