महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत 'भारत बंद' आंदोलनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद; फळ विक्रेत्यांचाही सहभाग - हिंगोली व्यापारी भारत बंद आंदोलन सहभाग

देशभरातील व्यापाऱ्यांनी आज भारत बंद आंदोलन पुकारले आहे. त्याला देशाच्या विविध भागातून पाठिंबा मिळत आहे. हिंगोलीतील व्यापारी आणि फळ विक्रेत्यांनी या बंदला पाठिंबा देत सहभाग घेतला आहे.

Hingoli
हिंगोली

By

Published : Feb 26, 2021, 11:46 AM IST

हिंगोली -जीएसटी कायद्यातील जाचक त्रुटी आणि ई-वे बिलविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने आज (26 फेब्रुवारी) देशव्यापी संप पुकारला आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातही व्यापारी महासंघाच्यावतीने बंद पाळण्यात आला. या बंदला भाजी आणि फळ विक्रेत्यांनीसुद्धा प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतो आहे.

बाजरपेठ बंद असल्याने रस्ते सुनसान आहेत

जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान -

गेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी जीएसटी कायद्याच्या विरोधात भडकलेले आहेत. या जीएसटी कायद्यांमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांनी अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वरिष्ठांना निवेदन देखील दिली आहेत. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे हिंगोलीतील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, जिल्ह्यात वैद्यकीय सेवा सुरू असून, नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंद -

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजने कॅटच्या मागण्यांना पाठिंबा देत संपात उतरणार असल्याची माहिती गुरूवारी दिली आहे. याउलट व्यापाऱ्यांच्या मागण्यांसह ई-वे बिलविरोधात आक्रमक झालेल्या माल वाहतुकदारांनीही शुक्रवारी वाहने बंद ठेवत देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. देशातील सात कोटी व्यापारी भारत बंदमध्ये सामील आहेत. जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी रद्द कराव्यात, अशी संघटनेची साधी मागणी आहे. फूड सेफ्टी अ‌ॅक्टमधील चुकीच्या तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी, टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये, या व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details