महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्रीडा संकुलनातील जलतरण तलाव दुरुस्तीचे भिजते घोंगडे दरवर्षी कायम - swimming pool

उद्घाटन झालेल्या वर्षी जेमतेम मोजकेच दिवस जलतरण तलावामध्ये पाणी होते. यावेळी स्पर्धाही झाल्या. स्पर्धेदरम्यान एका जलतरणपटूला फरशी निखळल्याने हाताला गंभीर जखम झाली होती. मात्र, त्याच्या काही दिवसानंतरच अचानक जलतरण तलाव बंद पडला.

हिंगोली जलतरण तलाव १

By

Published : Jul 7, 2019, 3:36 PM IST

हिंगोली- शहरापासून काही अंतरावर असलेले आणि क्रीडा विभाग अधिकाऱ्यांच्या जवळ असलेला लिंबाळा मक्ता भागातील जलतरण तलाव दुरुस्तीचे दरवर्षी भिजत घोंगडे कायम आहे. सन २००६ मध्ये उद्घाटन झालेल्या जलतरणात मोजकेच दिवस पाणी खेळले. या काळात येथे जिल्हास्तरीय स्पर्धाही झाल्या. मात्र, का कुणास ठाऊक कोणत्या कारणाने हा जलतरण तलाव बंद पडला आणि दुरुस्ती करण्यासाठी आजतागायत केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. उन्हाळा गेला आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हिंगोली जलतरण तलाव


जिल्ह्यातील लिंबाळा मक्ता परिसरात क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा संकुलन समितीच्या वतीने २७ मे २००६ रोजी तत्कालीन राज्य व पालकमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन झाले होते. उद्घाटन झालेल्या वर्षी जेमतेम मोजकेच दिवस जलतरण तलावामध्ये पाणी होते. यावेळी स्पर्धाही झाल्या. स्पर्धेदरम्यान एका जलतरणपटूला फरशी निखळल्याने हाताला गंभीर जखम झाली होती. मात्र, त्याच्या काही दिवसानंतरच अचानक जलतरण तलाव बंद पडला. तेंव्हापासून जलतरण तलाव दुरुस्त झाला नाही.

वास्तविक पाहता आतापर्यंत दुरुस्तीच्या नावावर शासनाचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तरीदेखील अद्याप साधी दुरुस्ती देखील झालेली नाही. विशेष म्हणजे जिल्हा क्रीडा कार्यालय हे शहरापासून कोसो दूर अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी काय घडामोडी घडतात याचा जराही थांगपत्ता लागत नाही. या विभागाच्यावतीने अनेक महत्वकांक्षी योजना राबविल्या जातात. त्या पूर्ण झाल्याचे अहवाल या विभागाकडे प्राप्त होतात. मात्र, जवळच असलेल्या जलतरण तलवाच्या अवस्थेवरून हा विभाग किती सतर्क असेल हे वेगळ्या शब्दात सांगायची अजिबात गरज नाही. एवढेच नव्हे तर जलतरण तलावाच्या दुरुस्तीसंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते अगोदर मनमुराद हसून घेतात. यानंतर या प्रवास सांगायला सुरुवात करतात. दुरुस्तीऐवजी नवीन जलतरण तलाव बांधलेला परवडेल, असेही अधिकारी सांगतात.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मुख्य कमानीवर असलेली जिल्हा क्रीडा संकुलन नावातील अनेक अक्षरे गळून पडत आहेत. ही स्थिती जवळपास १ ते २ वर्षांपासून आहे. त्याची देखील साधी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तेव्हा जलतरनिकेच्या दुरुस्तीचा कधी मुहूर्त लागेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विभागाकडे दुरुस्तीची विचारणा होते त्यावेळी फाईल त्या विभागकडे गेलीय, याची मंजूरी राहिली आहे, ते अपूर्ण राहिलीय, अशी कारणे देत नेहमीच दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवले जाते. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील जलतरण तलावाची पाहणी केली होती. त्यावेळी दुरुस्तीची हालचाली चालू झाल्या होत्या परंतु, इतक्यात त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details