हिंगोली - तालुक्यातील घोटा देवी येथे कार्यरत असलेल्या तलाठ्याने तक्रारदाराच्या आई व बहिणीचे हक्कसोड पत्राप्रमाणे जमिनीचा फेर त्यांच्या व त्यांच्या भावाच्या नावाने घेऊन तसा सातबारा बनवून देण्यासाठी लाच मागितली होती. हे लाचलुचपत विभागाच्या पडताळणीत सिद्ध झाले. मात्र, तलाठ्याला शंका आल्याने त्याने लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यानुसार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गवई असे या तलाठ्याचे नाव आहे.
'त्या' लाचखोर तलाठ्यावर गुन्हा दाखल, हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई - हिंगोलीत लाचखोर तलाठ्यावर गुन्हा दाखल बातमी
केसापूर शिवारातील घोटा देवी येथे कार्यरत एका तलाठ्याने सातबारा बनवून देण्यासाठी लाच मागितली होती. परंतु, शंका आल्याने त्याने लाच स्विकारण्यास नकार दिला. मात्र, लाचलुचपत विभागाच्या पडताळणीत ते सिद्ध झाले. त्यानुसार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली तालुक्यात गवई नामक तलाठ्याने केसापूर शिवारातील गट क्रमांक 291, 292, 303 व 307 मधील शेताचा त्याचे आई व बहिणीचे हक्कसोड पत्राप्रमाणे जमिनीचा फेर त्यांचे व त्यांच्या भावाच्या नावाने घेऊन तशी सातबारा बनवून देण्यासाठी तक्रारदरकडून 7 हजाराची लाच मागितली होती. तडजोडी अंती 5 हजाराची लाच देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून संबधित तलाठ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, तलाठी लाच मागत असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार लाचलुचपत पथकाने सापळा रचला. मात्र, तलाठ्याला संशय आला अन् त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणी संबंधित तलाठ्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षिका कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षिका अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोउपनी अफूने, पोहेकॉ बुरकुले, पोना विजयकुमार उपरे, संतोष दुमाने, न्यानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंढे, पोशी अविनाश कीर्तनकार यांनी केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडालेली आहे. तर, इतर तलाठ्यांचेही धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, तलाठी गवईवर ही दुसऱ्यांदा केलेली कारवाई आहे. याआधी 2012मध्ये याच तलाठ्यावर गुन्हा दाखल झाला होता.