हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही लॉकडाऊन असल्याने, प्रशासन अतिबारकाईने लक्ष ठेऊन आहे. अशा परिस्थितीत दारुड्यांचा ज्यादा दर आकारून चोरी छुपे ओला घसा करण्याचा डाव हिंगोली ग्रामीण पोलिसांनी उधळून टाकला आहे. यावेळी 60 हजार रुपयांची विविध कंपन्यांची दारू जप्त केली. या कारवाईमुळे चोरून दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लॉकडाऊनमध्ये दारुड्यांचा घसा ओला करण्याचा हॉटेल चालकांचा डाव फसला, ग्रामीण पोलिसांची कारवाई - police
सदरील दारू विक्रेता गोपी जयस्वालविरुद्ध संतोष वाठोरे यांच्या तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या बळसोंड परिसरात रस्त्याच्याच कडेला असलेल्या हॉटेल निमंत्रणमध्ये चोरून दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अगद सुडके यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तर, त्या ठिकाणी साठवून ठेवलेल्या विविध कंपनीच्या दारुच्या बाटल्या पाहून, पोलीस अवाक झाले. हॉटेलमध्ये विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या दारुच्या बाटल्यांचा शोध घेऊन 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने एकच गोंधळ उडाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने तळीरामांना दारू उपलब्ध करून देण्यात दारू विक्रेते चोरीछुप्या मार्गाचा अवलंब करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत मागेल तेवढी किंमत तळीराम दारूच्या बाटलीला मोजत आहे. त्यामुळे अशा प्रकारे जोखीम स्वीकारली जात आहे. यावरून अजूनही कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचे अजिबात गांभीर्य नसल्याचे या अजब प्रकारावरून दिसून येत आहे. सदरील दारू विक्रेता गोपी जयस्वालविरुद्ध संतोष वाठोरे यांच्या तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अगद सुडके यांच्यासह पोलीस जावेद, महंमद यांनी केली.