हिंगोली- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, गाडीवर विनाकारण फिरणाऱ्यांना अजूनही गांभीर्य नसल्याने वाहतूक शाखेच्या वतीने दुचाकी, चार चाकीवर कडक कारवाई केली जात आहे. अशातच काही जण पोलिसांवर दबाव टाकून गाडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.
गाडी सोडवण्यासाठी फोन करु नका.. हेही वाचा-परप्रांतीयांचा स्वगृही परतण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - अनिल देशमुख
हिंगोलीमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीदेखील मोकाट फिरणाऱ्यांना याचे अजिबात गांभीर्य नाही. वाहतूक शाखेच्या वतीने रोज अशा मोकाट फिरणाऱ्यांची वाहने जप्त करुन त्यांच्यावर कडक कारवाई करीत दंड वसूल केला जात आहे. आतापर्यंत हिंगोली वाहतूक शाखेच्या वतीने 732 वाहने जप्त करुन 3 हजार 276 वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 82 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. एवढे असतानाही काही जण पोलिसांना फोन करुन सदरची वाहने सोडून देण्यासाठी दबाव टाकत आहेत.
त्यामुळे आता वाहतूक शाखेच्या वतीने असा दबाव टाकणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर यांनी दिली. आता यानंतर गाडी सोडण्यासाठी आलेले सर्व कॉल हे रेकॉर्ड केले जातील व सर्व मॅसेज, व्हॉटसअप रेकॉर्ड पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.