हिंगोली-बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. दहशतवाद विरोधी पथक हिंगोली शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकाने मारलेल्या छाप्यात एकूण चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शहरातील आनंदनगर भागात करण्यात आली आहे. पोलिसांनी सतरा लाखांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनावट नोटा. तसेच 13 लक्ष्मी मूर्ती जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
संतोष जगदेवराव सूर्यवंशी(देशमुख), छायाबाई गुलाबराव भुक्तार अशी आरोपींची नावे आहेत. हिंगोली शहरातील आनंदनगर भागात एका भाड्याच्या बनावट नोटांचा कारखाना सुरू होता, याबाबतची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. यापूर्वी हिंगोली शहरात खोट्या नोटा आल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून पथक बनावट नोटा प्रकरणाचा तपास करत होते.
हेही वाचा-गे अॅपवर चॅटिंग करणे विवाहित तरुणाला पडले महागात; 4 जणांकडून मारहाण पैसेही गेले
साध्या वेशात पथक शहरातील सर्वच परिसर पिंजून काढत होते. पोलिसांचा बुधवारी संशय बळावल्यानंतर त्यांनी चारचाकीचा पाठलाग केला. ज्या ठिकाणी चारचाकी थांबली तेथील खोलीमध्ये छापा मारला असता मोठा नोटांचा खच आढळून आला. तेथून 50 रुपये ते 2 हजारापर्यंतच्या मूल्याच्या नोटा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी दोघा जणांसह चारचाकी वाहन, प्रिंटर, नकली नोटा, तसेच नोटा साठी वापरण्यात येणारा कागद जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर 13 लक्ष्मीच्या मूर्तीही ताब्यात घेतल्या आहेत.