हिंगोली- सुशिक्षित बेरोजगार मुलांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या वसमत शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नांदेड, मुंबई, लखनऊ येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल नऊ राज्यातील मुलांची या टोळी फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या कारवाईमुळे हिंगोली पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रवींद्र उर्फ राबीद्र दयानिधी संकुवा (वय ४६ वर्षे रा. ओडीसा, ह. मू काटेमान्नीवली जि. ठाणे), अॅड. नरेंद्र विष्णदेव प्रसाद (वय ५५ वर्षे, रा. लयरोपरुवार जि. मऊ उत्तरप्रदेश,) सतीश तुळशीराम हंकारे (रा. बोरगाव जि. नांदेड, ह. मु. अहमदपूर व नांदेड), आनंद पांडुरंग कांबळे (वय २४ वर्षे, रा. अहमदपूर, जि. लातूर), गौतम एकनाथ फणसे (वय ५६ वर्षे, रा. वाघनी, जि. ठाणे), अभय मेघशाम रेडकर उर्फ राने (वय ४८, रा. शिरोडा जि. सिंधुदुर्ग), मुख्य आरोपी संतोष कुमार सरोज ( वय २९ वर्षे, रा. बोडेपूर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी या टोळीतील आरोपीची नावे आहेत.
आरोपीने अति बारकाईने केलीय सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक
या टोळीतील आरोपी हे एका ठिकाणचे नसून विविध राज्यातील आहेत त्यांनी एकेक करत सुशिक्षित बेरोजगार मुलांची फसवणूक केली आहे. यातील मुख्य आरोपी हा संतोष कुमार सरोज असून त्याच्याकडे मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बनावट स्टॅम्प तसेच भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार नाव असलेले रेल्वे अधिकाऱ्यांच्या नावांचे बनावट नियुक्तीपत्र तयार करण्यासाठी लागणारे कागद, लपटॉप, रेल्वेचे बनावट ओळखपत्र व अनेक मुलांचे बनावट नियुक्ती पत्र आढळून आले आहेत. तसेच अनेक एटीएम कार्ड, मोबाईल व सदरील आरोपीच्या खात्यावर करण्यात आलेला आतापर्यंतचा व्यवहाराचे बँक डिटेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
आरोपींनी वापरलेली विविध 18 बँक खाती गोठवण्यात आली
ही टोळी राष्ट्रीय पातळीवरील असून या टोळीतील आरोपीने वापरलेले विविध बँकेतील १८ बँक खाते गोठवण्यात आले आहेत. तर आरोपीच्या खात्यातील ११ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. ५६ हजार रुपये रोख व ८ लाख रूपये किमतीची एक चारचाकी मोटार आणि ५० हजार रुपये किमतीचे सात मोबाईल ,असा वीस लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भारतभर आहे गुन्ह्याची व्याप्ती