हिंगोली -एक अट्टल दुचाकी चोर आखाडा बाळापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रविवारी रात्री पळून गेला होता. यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी केली होती. रात्रभराच्या तपासणीनंतर हा चोरटा सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांच्या हाती आला आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत असलेल्या घटना पाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरास ताब्यात घेण्यासाठी पथके स्थापन केली होती. पथके जिल्ह्यात जागोजागी चोरट्यावर लक्ष ठेऊन होते. गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहिती नुसार वसमत येथे दुचाकी विक्रीसाठी आलेल्या देगलूर येथील देविदास बाबुराव कांबळे याला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले अन त्याने नांदेड शहरातील अनेक दुचाकी चोरून हिंगोली जिल्ह्यात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी तब्बल 26 दुचाकी जप्त केल्या होत्या. याप्रकरणी दुचाकी चोरावर आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल केला आणि चोरट्याला आखाडा बाळापूर पोलिसांच्या हवाली केले होते.