हिंगोली- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण खेकड्याने फोडले, असल्याचा दावा जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केला. या दाव्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यवतीने खिल्ली उडविण्यात आली. 23 जणांचा बळी घेणारे हेच ते खेकडे आहेत. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन ताबडतोब अटक करा, या मागणीसाठी निवेदन देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने हिंगोली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत निषेध नोंदवण्यात आला.
23 जणांचा बळी घेणाऱ्या 'या' खेकड्यांवर गुन्हे नोंदवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी - Tanaji Sawant
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खेकड्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जर खेकड्यांवर गुन्हा दाखल करणार नसाल तर खेकड्यांनी धरण फोडले, असे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी हिंगोली राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. हे आंदोलन पाहण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती.

तिवरे धरण हे खेकड्यांनी पोखरल्यामुळेच फुटल्याचे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचे मत असल्याचा दावा सावंत यांनी केला होता. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचे सावंत यांनी सांगितले होते. सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण करत चक्क खेकड्याला जबाबदार धरले.
तानाजी सावंत यांच्या विधानाची संपूर्ण राज्यात खिल्ली उडविली जात असून, ही खिल्ली पोलीस ठाण्यापर्यंत देखील जाऊन पोहोचली. हिंगोलीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आरोपी असलेले खेकडे पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. हेच ते खेकडे आहेत, याच खेकड्यांनी 23 जणांचा बळी घेतला. त्यामुळे या खेकड्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करा, या मागणीचे निवेदन देत खेकडे पोलिसांच्या हवाली केले.