हिंगोली :Crime in Hingoli :हिंगोली तालुक्यातील डिग्रस वाणी गावाजवळ एका नालीत 11 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास तीन मृतदेह आढळून आले. कुंडलिक श्रीपती जाधव (वय 70), कलाबाई कुंडलिक जाधव (60) व आकाश कुंडलिक जाधव (27) अस या मृतांचं नाव आहे. तसेच, या ठिकाणी अपघातग्रस्त दुचाकी देखील होती. त्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलिसांनी घटनास्थळी जावून तिघांचेही मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केले होते.
हत्या केल्याचं सत्य समोर आलं : घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर प्रकरणाचा वेगळं वळण लागलं. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी घटनेचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरविली. मयत कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा महेंद्र जाधव याच्यावर संशय आला. पोलिसांनी महेंद्र यास चौकशीसाठी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यानेच तिघांची हत्या केल्याची माहिती समोर आली.
अशी केली हत्या : पोलीस सूत्राच्या माहितीनुसार 10 जानेवारीच्या भल्या पहाटे महेंद्र जाधव याने भाऊ आकाश जाधवला वीजेचा शॉक देण्याचा प्रयत्न आरोपीनं केला. मात्र, तसे न झाल्यानं त्याचे पाय बांधले. त्यानंतर त्याच्या डोक्यात वार करून त्याला संपवले. दुपारी आईला शेतात घेऊन गेला. तिकडे आईच्या डोक्यात रॉडचे वार करून तिला संपवलं. तर शेतातच आईचं गाठोडे बांधून ठेवलं. 11 जानेवारीच्या रात्री दीड वाजता वडिलांना घरातच रॉड डोक्यात टाकून मारलं. त्यानंतर त्याने एकेकाला दुचाकीवर बसवून नेत अपघास्थळी नेऊन टाकलं होत. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतची सत्यता पोलीस पडताळणी करत आहेत.
ही असू शकतात हत्येची कारणे :पोलिसांनी महेंद्र जाधव याला अटक करून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. महेंद्र जाधव वारंवार कुटुंबियांकडे पैशाची मागणी करत होता. त्यासाठी अनेक वेळा त्याचे भांडण देखील झाले होते. कुटुंबीयांसोबत अनेक वेळा वाद होत असायचे. त्यातच नातेवाईकांमध्ये आई-वडील आणि भाऊ बदनामी करत असल्याचा त्याला राग होता. त्यामुळेच त्यांनी ही हत्या केली अशी प्राथमिक माहिती पोलिसांना दिली. तर, महेंद्र याचे परिसरातील एका महिलेची अनैतिक संबंध होते. ते कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे रस्त्यातला काटा काढण्यासाठी त्यानं हत्या केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. हत्येबाबत सखोल तपास पोलीस करत आहेत.