महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात शासनाचा लवाजमा घेऊन पालकमंत्री करणार टंचाईग्रस्त गावांची पाहणी - hingoli

निदान अंतीम टप्प्यात पालकमंत्र्यानी दुष्काळी दौरा करून प्रशासनाला कायमस्वरूपी त्या-त्या गावात उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.

दुष्काळ

By

Published : May 9, 2019, 8:20 AM IST

Updated : May 9, 2019, 8:42 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक गावांत हंडाभर पाण्यासाठी २ ते ३ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यात ४५ वर टँकर सुरू करण्यात आले आहे. तर ६०० वर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बऱ्याचशा गावांत पाणी टंचाईला कंटाळून ग्रामस्थ गाव सोडून गेले आहेत. त्यासाठी आज शेवटच्या टप्यात जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे शासनाचा लवाजमा घेऊन या टंचाईग्रस्त गावांना भेट देणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळाचे दृश्य

प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सर्वोतरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ प्रस्तावाच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. मात्र, टँकरच्या मंजुरीसाठी आलेल्या फाईली पुढे सरकवण्याचे नावच घेत नाही. हा अनुभव हिंगोली तहसीलमध्ये सर्वांनाच येत आहे.

अनेक गावे टंचाईने होरपळत असताना पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर खरोखरच त्या-त्या गावात प्रशासनाकडून उपाय योजना होतील का? हादेखील प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. गेल्या २ ते ३ वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने यंदा कधी नव्हे ते तलाव कोरडे ठाक पडले आहेत. विशेष म्हणजे जलसंपदा अन् उपविभागीय अधिकारी हिंगोली यांच्या ताळमेळामुळे जिल्ह्यातील हळदवाडी येथील शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही. त्यामुळे त्या तलावाचेदेखील काम दिवसेंदिवस रेंगाळत चालले आहे. हा तलाव झाला असता तर या भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली असती. याकडेही पालकमंत्री कांबळे यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाईदेखील मोठ्याप्रमाणात आहे. अनेक पशुपालक जीवापाड जपलेली गुरे चाऱ्या अभावी कवडीमोल दराने विक्री करीत आहेत. ही परिस्थिती ओंढा नागनाथ परिसरात सर्वाधिक जास्त असल्याने त्या भागात चारा छावणी सुरू करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार संतोष टारफे हे करणार आहेत. मागणी केल्यानंतर खरोखरच चारा छावण्या सूरू होतील का? की हीही मागणी केवळ मागणीच राहते. याकडेदेखील आता ओंढा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अनेक भागात वन्यप्राणी पाण्यासाठी सैरावैरा भटकंती करीत आहेत. जनावरे सांभाळणारे शेतकरी अक्षरशः चिंतातूर झाले आहेत. निदान अंतीम टप्प्यात पालकमंत्र्यानी दुष्काळी दौरा करून प्रशासनाला कायमस्वरूपी त्या-त्या गावात उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्याची मागणी नागरिकातून होत आहे. दुष्काळी दौऱ्यानंतर पालकमंत्री कांबळे हे १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा जवान संतोष चव्हाण यांच्या कुटुंबाची ब्राम्हणवाडा येथे जाऊन भेट घेणार आहेत. पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.

Last Updated : May 9, 2019, 8:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details