हिंगोली- निलगाय म्हटले की शेतातील पिकांची नासाडी आलीच. त्यामुळे त्यांना शेतकरी शेतातून पळवून लावत असतात. एवढेच नव्हे शेतांना तारेचे कुंपण करून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला जातो. यामुळे असंख्य जंगली प्राणी मृत्युमुखी पडतात. मात्र, एखादा शेतकरी कधी कधी प्राणीमात्रांवर दया देखील दाखवतो. जिल्ह्यातील पिंपळा गावातील एका शेतकऱ्याने नील गाईच्या पाडसाला जीवनदान दिल्याची ही कहानी आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पिंपळा गावचे शेतकरी पंढरीनाथ पोले दीड वर्षांपूर्वी आपल्या शेतात कापसावर फवारणी करत होते. शेतात जवळच एका ठिकाणी ४ ते ५ कुत्रे जारजोरात भुंकत होती. सुरुवातीला फवारणीचे काम सुरू असल्याने पोले यांनी त्या कुत्र्यांकडे लक्ष दिले नाही. मात्र, कुत्रे जास्तच मोठ्याने भुंकत असल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले. तर, तुरीच्या शेतात एक निलगाय प्रसूती वेदनेने विव्हळत होती. कुत्रे त्या गाईवर आणि नुकत्याच जन्म दिलेल्या पाडसावर धावून जात होते. ते त्या पाडसाला भक्ष बनवणार तोच पंढरीनाथ यांनी कुत्र्यांना तेथुन हाकलून लावले. परंतु, वेदनेतून मुक्त होताच त्या निलगायीने पाडस तिथेच ठेवुन कुत्र्यांच्या भीतीने तिथून पळ काढला.
पोले यांनी पाडसाची काळजी घेत सायंकाळी उशिरापर्यंत पिलांच्या आईची प्रतीक्षा केली. मात्र, निलगाय परत आली नाही. त्याला जर तेथे तसेच ठेवले असते, तर कुत्र्यांनी त्याचा फडशा पाडला असता. त्यामुळे ते पाडसाला घेऊन घरी गेले.
आता त्या पाडसाला दुध कसे पाजायचे? हा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांनी त्याला लहान पाडसाला घरच्या गायींचे दूध पाजण्याचा प्रयत्न केला. गायीने अनोळखी दिसणाऱ्या या पिल्लाला सुरुवातीला लाथा मारल्या. मात्र, नंतर तिने त्या पाडसाला दूध पिऊ दिले. मग रोजच असा दिनक्रम सुरू झाला. हळूहळू पाडस गायींच्या कळपात मोठे होत गेले. चारा खाऊ लागले. ते घरच्या इतर जनावरांसोबत शेतात चरण्यासाठी जाऊ लागले. गावामध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. त्यामुळे पोले यांनी गुरेच शेतात बांधण्यास सुरुवात केली. ते पाडस मात्र, गुरांजवळ मोकळेच राहू लागले. त्या पाडसाला गुरांचा एवढा लळा लागला आहे की, ते एकही क्षण गुरांना सोडून राहत नाही.
पाडस इतर गाई वासरांसारखे पाणी पीत नाही. त्याला पाणी पाजताना पाण्यात हात ठेवावा लागतो, तरच ते पाणी पिते. नाहीतर दिवसभर पाणी पीत नाही. त्यामुळेच त्याची खूप काळजी घ्यावी लागते. आजही जंगलात नीलगाईंचे कळप शेताजवळ येतात. मात्र, हे पाडस त्याच्या कळपात जात नाही. त्याला आता गाईंचा कळपच आवडू लागला आहे. ते पाडस बिनधास्तपणे गाईंच्या कुशीत जाऊन बसते. पंरतु आता हिरवा चारा नसल्याने या पिलाची तब्येत खराब झाली आहे. त्यामुळे हे पिल्लू वन विभागाच्या स्वाधीन करणार असल्याचे पोले यांनी सांगितले.